उमेदवार महाडिकांचा… पक्ष शेट्टींचा…!
उमेदवार महाडिकांचा… पक्ष शेट्टींचा…!
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, September 23rd, 2009 AT 12:09 AM
कोल्हापूर – हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रय विष्णू घाटगे यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे समजते. कॉंग्रेसची उमेदवारी राजूबाबा जयवंतराव आवळे यांच्याच पदरात पडणार असल्याच्या हालचाली आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील चौरंगी लढत निश्चित झाली आहे.
श्री. घाटगे यांचे नाव आमदार महादेवराव महाडिक यांच्या ताराराणी आघाडीकडून यापूर्वीच निश्चित होते. त्यांनाच आता संघटना उमेदवारी देत असल्याने उमेदवार महाडिकांचा आणि पक्ष शेट्टींचा अशीच काहीशी स्थिती तयार झाली आहे.
आमदार राजीव आवळे यांची जनसुराज्य पक्षातर्फे उमेदवारी निश्चितच आहे. शिवसेनेतर्फे डॉ. सुजित मिणचेकर यांच्या नावाची कालच घोषणा झाली. त्यामुळे स्वाभिमानीचा उमेदवार कोण, ही मतदारसंघात उत्सुकता आहे. संघटनेतर्फे दोन-तीन कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितली आहे; परंतु त्यांची राजकीय ताकद अगदीच मर्यादित असल्याने तात्त्विक राजकारण गुंडाळून ठेवून श्री. शेट्टी यांना आयात उमेदवारास संधी द्यावी लागत आहे.
श्री. घाटगे सुमारे पंचवीस वर्षांहून अधिक काळ खासदार जयवंतराव आवळे यांचेच एकनिष्ठ कार्यकर्ते. एकदा जिल्हा परिषद व दोनदा पंचायत समितीची निवडणूक वेगवेगळ्या मतदारसंघांतून त्यांनी लढवली व जिंकूनही दाखवली. श्री. आवळे समाजकल्याणमंत्री असताना त्यांचा बहुतेक कारभार घाटगेच सांभाळत होते; परंतु गेल्या निवडणुकीत श्री. आवळे यांचा विधानसभेला पराभव झाल्यानंतर घाटगे त्यांच्यापासून काहीसे दूर गेले. त्याचे महत्त्वाचे कारण असे, की जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत आवळे यांनी आपल्याला संधी द्यावी, असे श्री. घाटगे यांना वाटत होते; परंतु त्यांनी स्वतःच्या मुलालाच बॅंकेचे संचालक केल्याने श्री. घाटगे यांनी नाराज होऊन “वारणे’ची वाट धरली. भविष्यात उपयोगी पडणारा कार्यकर्ता म्हणून विनय कोरे यांनी त्यांना वारणा कारखान्याचे संचालक केले. विधानसभेला कॉंग्रेसमधून आवळे स्वतःच्या मुलासाठीच प्रयत्न करणार, हे स्पष्ट होते. जनसुराज्य राजीव आवळेंनाच पुन्हा संधी देणार हेदेखील स्पष्ट असल्याने श्री. घाटगे यांनी सुरवातीला शिवसेनेची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले; परंतु तिथेही त्यांना अपयश आले. त्यामुळे ते आमदार महादेवराव महाडिक यांच्या ताराराणी आघाडीचे उमेदवार निश्चित झाले होते; परंतु तिथे स्वाभिमानीचा उमेदवार असल्यास मतविभागणी होऊ शकते म्हणून घाटगे यांनाच स्वाभिमानीची उमेदवारी द्यावी, असा आग्रह महाडिक यांच्याकडून झाल्याचे समजते. श्री. घाटगे निवडून आलेच आणि ते संघटनेचे आमदार असले, तरी महाडिक यांच्या कह्यात जातील, अशी एक चर्चा होती. खुद्द श्री. शेट्टी यांच्याही मनात तशी भीती आहे. संघटनेची उमेदवारी व महाडिक गटाचा पाठिंबा मिळाल्यास कॉंग्रेसच्या राजूबाबा आवळे यांना ते अडचणीचे ठरू शकते म्हणून ही चर्चा मुद्दाम खासदार आवळे यांच्याकडून सुरू करण्यात आल्याचे घाटगे गटाचे म्हणणे आहे.
“स्वाभिमानी’ची कोंडी!
“स्वाभिमानी’तून विक्रांत सोनवणे यांना उमेदवारी मिळेल, असे वाटत होते; परंतु त्यांचे नाव मागे पडले. पुढच्या टप्प्यात गायक अभिजित कोसंबी याच्या नावाची नुसतीच चर्चा झाली. संघटनेकडेही अन्य सक्षम पर्याय नसल्याने त्यांना श्री. घाटगे यांना उमेदवारी देण्याशिवाय गत्यंतरच नसल्याचे चित्र पुढे आले आहे