डुकरांना धुण्यापेक्षा गटारात घाणच होऊ देऊ नका – खासदार राजू शेट्टी
नागपूर – राजकारणाचे गटार झाले, असा सामान्य नागरिकांचा समज झाला आहे. या गटारात लोळणाऱ्या डुकरांना धुण्याऐवजी गटारात घाणच होणार नाही, याची काळजी घेऊन नागरिकांनी स्वच्छ प्रतिमेचे लोकप्रतिनिधी राजकारणात पाठविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी आज येथे केले.
जनमंचातर्फे आयोजित न्या. अशोक देसाई स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना “सामाजिक न्याय व लोकप्रतिनिधींची भूमिका’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार दत्ता मेघे होते. व्यासपीठावर जनमंचाचे अध्यक्ष अशोक लांजेवार, सचिव राजीव जगताप, सल्लागार प्रा. शरद पाटील, ऍड. अनघा देसाई उपस्थित होते.
शेट्टी म्हणाले, राजकारणात 70 टक्के लोकप्रतिनिधींना जबाबदाऱ्यांचे भान नसते. लोकशाहीत लोकप्रतिनिधींनी निर्णय घ्यावा आणि प्रशासनाने अंमलबजावणी करावी, अशी चौकट आहे. परंतु, ही चौकट तोडून वाटेल तसे निर्णय घेण्यात येतात. ग्रामपंचायत सदस्य मर्जीतल्या लोकांना अतिक्रमणाचा सल्ला देतो. जिल्हा परिषद सदस्यही आरोग्य, शिक्षण या विषयाकडे दुर्लक्ष करून शिक्षकांच्या बदल्यांसाठी धडपड करताना दिसतात. नगरसेवकही अमाप पैसा खर्च करून हेराफेरीत गुंतलेले दिसतात. सेवेऐवजी मेवा खाण्याची वृत्ती वाढली आहे. पैसा कमविण्याचे साधन म्हणून राजकारणाकडे पाहिले जाते. विधानसभेतही हीच परिस्थिती आहे. हक्कभंग होईल म्हणून या विषयावर आता काही बोलणार नाही; परंतु निवृत्त झाल्यानंतर यावर आत्मचरित्रच लिहिणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
सर्वसामान्यांच्या मनात राजकारणाविषयी किळस निर्माण होण्याची स्थिती का निर्माण झाली ? याचे चिंतन करण्याची गरज असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. शेट्टी म्हणाले, मतदारांनी राजकारणावर टीका करण्यापेक्षा स्वच्छ प्रतिमेच्या लोकप्रतिनिधींना निवडून देण्याची गरज आहे. आजकाल 100 पैकी 45 लोक मतदान करतात. 22 मते घेणारा निवडून येतो. यासाठी उदासीन मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना मतदानाविषयी जागरूक करण्याची गरज आहे. जनक्षोभात ताकद असून ही ताकद संघटितरीत्या व्यक्त झाल्यास राजकारणाचे स्वरूप पालटेल.
यावेळी खासदार दत्ता मेघे यांनीही मनोगत व्यक्त केले. व्याख्यानमालेच्या आयोजनाविषयी ऍड. अनघा देसाई यांनी माहिती दिली. राजीव जगताप यांनी जनमंचाच्या कार्याची माहिती दिली. अशोक लांजेवार यांनी जनमंचातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांवर प्रकाश टाकला. प्रास्ताविकातून शरद पाटील यांनी स्व. अशोक देसाई यांच्या सामाजिक वृत्तीचे दर्शन घडविले. व्याख्यानाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.