राजकारण म्हणजे पैसा कमविण्याचा धंदा नव्हे – राजू शेट्टी
पिंपरी, २ नोव्हेंबर / प्रतिनिधी
राज्य विधानसभेच्या निवडणुकीत विरोधी पक्षांना जनतेचा विश्वास संपादन करता आला नाही. त्यामुळेच पात्रता नसतानाही आघाडी सरकार पुन्हा सत्तेवर आले, अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी िपपरीत बोलताना केली. राजकारण ही गटारगंगा झाली आहे, असे मत व्यक्त करीत राजकारण म्हणजे पैसा कमविण्याचा धंदा नव्हे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.िपपरी-चिंचवड श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने िपपरीतील लोखंडे कामगार भवनात शेट्टी यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष नंदकुमार सातुर्डेकर होते. यावेळी शेट्टी यांनी कार्यकर्ता ते खासदार असा प्रवास सांगतानाच पत्रकारांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली. राजकारण म्हणजे पैसे कमाविण्याचा धंदा नाही, नैतिकता जपूनही राजकारण करता येते, मोहापासून दूर राहता येते, असे ते म्हणाले. लोकांचा चांगुलपणावरचा विश्वास उडता कामा नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
शेट्टी म्हणाले की, राजकारण हा पैशावाल्यांचा, जातीयवादी राजकारण करणाऱ्यांचा तसेच गॉडफादर पाठिशी असलेल्यांचा खेळ आहे, असा चुकीचा समज आहे. लोकांचा विश्वास संपादन केला तर सामान्य कार्यकर्ताही यशस्वी होऊ शकतो. राजकारण ही गटारगंगा आहे, रिकामटेकडय़ांचा उद्योग आहे, असे म्हणत या गटारगंगेचा तिरस्कार करण्याऐवजी आत्मविश्वासाने हात घालून मात्र गटाराची घाण हातास लागणार नाही, याची काळजी घेत हे गटार साफ केले पाहिजे, असे ते म्हणाले. राजकारणाच्या शुध्दीकरणाची मोहीम माझ्या हयातीत होणार नाही, याची जाणीव असूनही त्याच्या शुध्दीकरणासाठी प्रयत्न करताना मैलाचा एक दगड बनण्याचा प्रयत्न मी करणार असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले.
रस्त्यावरच्या लढाईला सभागृहातील लढाईची जोड दिली तर अधिक प्रभावीपणे काम करता येते, असे मतही त्यांनी व्यक्त केले. प्रश्नस्तविक नंदकुमार सातुर्डेकर यांनी केले. सूत्रसंचालन जयंत जाधव यांनी केले. विनोद पवार यांनी आभार मानले.
‘कृषिमंत्र्यांकडून प्रस्थापितांच्या हिताचे निर्णय’
शरद पवार यांनी कृषीमंत्री झाल्यानंतर साखरसम्राट तसेच विशिष्ट वर्गाला डोळ्यासमोर ठेवून धोरणे राबविली. शेतकऱ्यांपेक्षा सहकारातील प्रस्थापितांच्या हिताचे निर्णय घेतले. साखर आयात-निर्यातीबाबत चुकीचे निर्णय घेतले. त्यामुळे शेतकरी तसेच ग्राहकांचेही नुकसान झाले, अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली.