राजू शेट्टी यांच्या प्रचाराचा प्रारंभ शनिवारी
इचलकरंजी – देशात स्थापन झालेल्या तिसऱ्या आघाडीचे व महाराष्ट्रात स्थापन झालेल्या डाव्या लोकशाही आघाडीचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाचे नेते आमदार राजू शेट्टी यांच्या येथील प्रचाराचा प्रारंभ शनिवारी (ता. ४) होणार आहे. येथील अण्णा भाऊ साठे मैदान, आवळे गल्ली येथे दुपारी चारला प्रचार प्रारंभाची जाहीर सभा होणार आहे.
श्री. शेट्टी, प्रताप होगाडे, दत्ता माने, भगवानराव काटे, सूर्याजी साळुंखे, भाई शिवाजी साळुंखे, हणमंता लोहार, प्रा. ए. बी. पाटील, दशरथ सावंत आघाडीतील पक्षांचे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, जनता दल (धर्मनिरपेक्ष), भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सोशालिस्ट फ्रंट अशा आघाडीत सहभागी असलेल्या सर्व घटक पक्षांच्या प्रमुखांची बैठक जनता दल कार्यालयात प्रताप होगाडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रासाठी आघाडीचे प्रचारप्रमुख म्हणून दत्ता माने यांची निवड केली. जनता दल (धर्मनिरपेक्ष) इचलकरंजी कार्यालय व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष कार्यालय ही दोन्ही कार्यालये आघाडीची कार्यालये राहतील, असेही निश्चित केले आहे.
देशपातळीवर स्थापन झालेली तिसरी आघाडी निश्चितपणे सत्तेवर येईल आणि राजू शेट्टी सत्तेत सहभागी असतील, असा विश्वास या पत्रकार परिषदेमध्ये डाव्या लोकशाही आघाडीचे राज्यस्तरीय निमंत्रक प्रताप होगाडे यांनी व्यक्त केला.