राजू शेट्टी यांना अनावृत पत्र
खासदार राजू शेट्टी
सन्माननीय राजू शेट्टी यांना,
सप्रेम नमस्कार
विधानसभा निवडणुकीनंतर आपण प्रथमच कोल्हापुरात काल पत्रकारांशी संवाद साधला. खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्याशी झालेल्या वादात संघटनेचे नुकसान झाले, असा तुमचा बोलण्याचा सूर होता. हे वाचत असताना मला विक्रमसिंह घाटगे यांनी निवडणुकीतील जाहीर सभेत बोलताना केलेल्या एका वक्तव्याची आठवण झाली. ते म्हणाले होते, की राजू शेट्टी यांची संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चळवळ करणारी आहे, असे मी मानत होतो. मात्र; इकडे याला आणि तिकडे आणखी कोणाला तरी पाठिंबा देऊन ही संघटना राजकारण करणाऱ्यांची बनली आहे. वास्तविक हा अधिकार इतर राजकारण्यांप्रमाणे तुम्हालाही आहे. त्याला आक्षेप नाही. प्रश्न आहे तो तुमच्याकडून वेगळ्या अपेक्षेचा. म्हणूनच राजू शेट्टी नावाची “हवा’ तयार झाली. आम्ही काही करू शकलो नाही, असे गृहमंत्री जयंत पाटील यांनाही लोकसभा निवडणुकीनंतर कबूल करावे लागले होते.
गेल्या २५ ऑक्टोबरच्या ऊस परिषदेतील तुमच्याच एका वक्तव्याचीही आठवण होते आहे. त्यात तुम्ही म्हणाला होता, की निवडणुका लढविणे हा काय आमचा धंदा नाही. आम्ही आर्थिक प्रश्नांवर चळवळ करणारे आहोत. हीच ओळख घेऊन तुम्ही लोकसभा निवडणुकीत उतरला होता. त्यावेळी मी आपल्याशी बोलताना म्हणालो होतो, की शेतकऱ्यांचे प्रश्न निवडणुकीत चर्चेचे बनविण्याचे श्रेय तुम्हाला जाते आहे. निवडून याल न याल, पण बहुसंख्य शेतकरी मतदार असणाऱ्या मतदारसंघात त्यांच्याच प्रश्नांवर गांभीर्याने चर्चा होताना दिसत नाही. ती तुमच्या उमेदवारीमुळे होत आहे, याचा उल्लेखही मी एका लेखात केला होता आणि त्याचा संदर्भ आपणही एका प्रचार सभेत दिला होता. असो.
लोकसभा निवडणुकीनंतर राजू शेट्टी अशी एक तुमची हवा तयार झाली. राज्याच्या कोनाकोपऱ्यातून माझ्याकडे विचारणा होत होती, की विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांच्या संघटनेचा धक्का कॉंग्रेस आघाडीला बसणार का? तो किती जोराचा असेल? वगैरे… वगैरै. तेव्हा मी सांगत होतो, की तिसऱ्या आघाडीत सामील झाल्याने संमिश्र यश मिळेल; मात्र ज्याचा तुम्ही काल उल्लेख केला, (मंडलिकांशी वाद) त्यानंतर सर्व चित्रच बदलले. तुमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे “संधिसाधू’ राजकारण सुरू झाले. त्यामुळे राजू शेट्टी यांना एखादी जागा मिळेल किंवा तीही मिळणार नाही, असे माझे मत झाले. “हिंदू’चे संपादक पी. साईनाथ निवडणुकीच्या काळात दूरध्वनीवरून मला विचारत होते तेव्हा हेच मत मी सांगितले, तेव्हा त्यांनी आश्चर्य व्यक्त करीत सवाल केला, की लोकसभा निवडणुकीत चार विधानसभा मतदारसंघांत राजू शेट्टी यांना मताधिक्य असताना आता असे काय घडले?
वास्तविक संधी साधत राजकारण केले, तर ते लोकांना फारसे आवडत नाही. ज्यांची हवा आहे, त्यांनाही लोक जमिनीवर आणतात. शिरोळमध्ये पराभव झाला तरीसुद्धा तुम्ही म्हणता, की मते वाढली. वास्तविक मतदार वाढले आहेत आणि मतविभागणी कमी झाली. त्यामुळे तुम्हाला आमदार होताना मिळाली त्यापेक्षा अधिक मते यावेळी उल्हास पाटील यांना मिळाली, हे खरे वास्तव आहे.
मंडलिक म्हणत होते, की राधानगरीत मला ४१ हजारांचे मताधिक्य मिळाले आहे, ती जागा मलाच हवी. तुम्ही म्हणत होता, की तेथे मंडलिकांचे काय आहे, आमच्या संघटनेची ताकद आहे म्हणून तुम्हाला (मंडलिकांना) मते मिळाली. झाले वेगळेच. चार महिन्यांपूर्वी याच मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार ४१ हजार मतांनी मागे होता. आता तेथे राष्ट्रवादीच्या उमेदवारास ४१ हजारांचे मताधिक्य मिळाले. मतदार तेच, इतके मतदार बदलले कसे?
सांगली जिल्ह्यातील शिराळा मतदारसंघात शिवाजीराव नाईक राष्ट्रवादीचा प्रचार करीत होते. त्यांचे कार्यकर्ते तुमच्या मागे होते, हा त्यांचा दुटप्पीपणा लोकांना दिसत होता. त्याच शिवाजीरावांच्या (कॉंग्रेसच्या) प्रचारात तुम्ही गेलात. ही बातमी ठळकपणे प्रसिद्ध व्हावी, यासाठी मानसिंगराव नाईक प्रयत्न करीत होते. विरोधी उमेदवाराची बातमी चांगली यावी, यासाठी होणारा हा प्रयत्न का होता? कारण दुटप्पी राजकारणाविषयी लोकांना राग येतो. तसा तो आला नसेल तरच नवल. (सांगलीचे खासदार प्रतीक पाटील यांनीही तुमच्या दोघांच्या (शेट्टी आणि मंडलिक) विजयाचा उत्सव साजरा केला होता. त्याचा परिणाम सांगलीत कॉंग्रेसचे पानिपत होण्यात झाला, ते आपण पाहतोच आहोत. भले, त्याला तुम्ही भगवी लाट म्हणा अन्यथा काहीही. शाहूवाडी मतदारसंघात अशी भूमिका तुमची होती. सर्व पेरा फेडण्यात तुमची ताकद संपली आणि स्वतःचे रान नांगरायचं राहूनच गेलं.
हे झालं राजकारण! मूळ विषयाकडे येतो. विद्यार्थी असताना मीही शेतकरी संघटनेचा झेंडा घेऊन नाचत होतो. निपाणीच्या तंबाखू उत्पादक आंदोलनात सहभागी झालो होतो. अटक होता होता वाचलो, कारण तोंडावर परीक्षा होती. तरीही ऐकत नव्हतो आम्ही. शरद जोशींनीच आम्हाला बाजूला होण्याचा आदेश दिला. तरुण असताना शेतकरी संघटनेचा आर्थिक विचार भावणारा आहे. तो आजही भावतो, काही प्रमाणात पटतोही. शेतीमालाचे भाव पाडण्याचे राजकारणच अनेक राज्यकर्त्यांनी केले. जनता पक्षाची राजवट आली तेव्हा तर महागाई कमी करण्यासाठी भाव इतके पाडले, की साखर ९० पैसे किलो झाली. आमचा तंबाखू बारा-तेरा रुपयांवरून ७०-८० पैसे किलोने कोणी विकत घेईना. महागाईची चर्चा केवळ शेतीमालाच्या भोवतीच फिरते. शेतकऱ्याच्या मालाचा उत्पादनखर्च किती वाढला आहे? त्याप्रमाणे भाव मिळायला हवा. तसा तो मिळत नाही म्हणून तुम्हीच संघटना चालविता आणि राजकारण्यांना वठणीवर आणता.
साखर कारखानदारी कशाप्रकारे चालविली जाते, त्याचा अनुभवही आपल्या गाठीशी आहे. सांगलीचा वसंतदादा साखर कारखाना दोनशे कोटी रुपयांचे कर्ज अंगावर घेऊन बंद पडला आहे. कृष्णा नदीच्या काठावरील कारखाना बंद पडतोच कसा? केवळ गैरकारभार हेच उत्तर असेल तर त्यावर उपाय काय? तर तुम्ही घेता तसे दांडके हातात घेणे; मात्र सोयीचे राजकारण करीत राहिला तर काय होणार? शेतीमालाचे भाव वाढवून मिळाल्याने महागाई वाढली, असे शिवसेना म्हणत होती. (त्याच शिवसेनेला तुमचे बंधुतुल्य रघुनाथदादा पाठिंबा देत होते.) शिवसेनेचे शेतीविषयक असे कोणते तत्त्वज्ञान किंवा अजेंडा आहे म्हणून तुम्ही पाठिंबा देता, असा सवाल केला तर? कॉंग्रेस आघाडीवाल्याप्रमाणेच त्यांचेही धोरण आहे. वेगळे काय? त्यामुळे शेतीमालाचे भाव वाढवून तर हवेत. महागाई वाढली म्हणून गोपीनाथ मुंडे कांदा, बटाटे घेऊन विधानभवनावर चाल करून गेले होते. महागाईचे दुकान मांडले होते आणि किरीट सोमय्या यांना गल्ल्यावर बसविले होते. (हे अधिवेशन काळात घडले होते, त्यामुळे तुम्हाला ते आठवत असेलच.)
औषधे महागली, शिक्षण महागले, पेट्रोल-डिझेल महागले तरी ओरड नाही. सर्व दवाखाने फुल्ल आहेत. डॉक्टरांचा मोर्चा नाही. (औषधे स्वस्त करा म्हणून) शिक्षण महागले तरी शिक्षण संस्थांचालकांचा मोर्चा नाही, (तसेच शिक्षक-प्राध्यापकांचा मोर्चा नाही) पेट्रोल-डिझेल महागले म्हणून दुचाकी-चारचाकी वाहनांचे कारखाने बंद पडल्याचे ऐकीवात नाही. ही गोष्ट निश्चितच सुस्थितीतील लोकांची आहे. गरिबांनी काय करावे? प्रश्न बरोबर आहे. चाळीस रुपयाने साखर खाणे परवडणारे नाही. ती वीस रुपयाने दिली तर परवडेल का? तर उत्तर होय म्हणून येईल. ऊस उत्पादन आणि साखर उत्पादनाचा खर्च किती? तो एका किलो साखरेच्या मागे किती पडतो? साखरेचे दर गेल्या नोव्हेंबरमध्ये १४०० रुपये क्विंटल होते, तेव्हा १२०० च्या मागणीवर तुम्ही तडजोडी केल्या. आता साखर ३४०० रुपये झाल्यावरच दोन हजारच्या पुढे दर आपोआप जाहीर होत आहेत; मग गरिबांना कमी दरात साखर देण्यासाठी सरकारने बाजारात उतरावे. ३५ रुपयाने साखर खरेदी करावी आणि तीन-चार किंवा दहा-बाराने रेशनवर विकावी.
तूरडाळीची इतकी ओरड चालू आहे. मध्यमवर्गीयांना तुम्हीच सांगा, की तूरडाळीचे एकरी उत्पादन किती होते? चार-पाच क्विंटल? कशी शेती परवडणार? इतर खर्च इतके वाढले आहेत, की त्यासाठी लागणाऱ्या पैशासाठी शेतकरी कडधान्यांकडून नगदी पिकांकडे वळतो आहे. परिणामी डाळी आयात करायची वेळ येते आहे. ती मिळत नाही, मिळाली तरी परवडत नाही आणि परवडली तरी शिजली नाही, अशी अवस्था आहे.
यातून शेतकरी मार्ग काढणार कसा? शेतीमालाचे भाव वाढवून मिळावेत, यासाठी दबाव निर्माण करून राज्यकर्त्यांना ठणकावणारे म्हणून शरद जोशींकडे शेतकरी आकर्षित झाले होते; मात्र त्यांनी राजकारणच केले. भारतीय जनता पक्षाचे या विषयावरील धोरण क्रांतिकारक असावे, अशी भावना त्यांची झाली वाटते. ते त्यांच्या वळचणीला जाऊन बसले. तुम्ही ते बरोबर हेरले आणि स्वाभिमान दाखविला म्हणून राजू शेट्टीत शेतकरी “हीरो’ शोधू लागले. तुम्ही पण शरद जोशींच्या मार्गाने जाणार का? शेतीमालाच्या दराचा हा चक्रव्यूह कसा फोडणार? हा सर्वांसमोर सवाल असताना संधिसाधू राजकारणाच्या निवडणुकीच्या राजकीय डावपेचात अडकून पडणार आहात का? तुमची संघटनाही राजकारण्यांची करून टाकणार आहात का? भाव पडले तर शेतकऱ्यांना परवडत नाही आणि वाढले तर खाणाऱ्यांना (गरीब वर्गाला उद्देशून, सहाव्या वेतन आयोगवाल्यांना नव्हे) परवडत नाही. अशा वेळी अन्न सुरक्षा योजना पुढे ये आणि सरकार बाजारपेठेत उतरत असेल तर त्याचे स्वागत करायला हवे. आणि महागाईच्या नावाने शेतीमालाचे दर पाडणारे राजकारण हाणून पाडण्याचे राजकारण केले पाहिजे; अन्यथा शाहूवाडीचा पैरा फेडणार, नंतर शिराळ्याचा पैरा, वाळव्याचा पैरा आणि शिरोळमध्ये तुमचेच शेत नांगरायचं राहून जाणार, हे राजकारण तुम्हाला करायचे होते का? असेल तर अवश्य करा. अनेक जण शेतकऱ्यांच्या नावानं चांगभलं म्हणत राजकीय चुलवाण मांडतात, त्यात तुमची एक भर पडली! फरक काय पडतो?
आपला हितचिंतक,
वसंत भोसले