वहिनींना ‘सुट्टी’ आता राजू शेट्टी
कोल्हापूर – हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार निवेदिता माने यांना ९५ हजार ६० मतांनी पराभूत करून धक्का दिला. मातब्बर प्रस्थापित नेते विरोधात असतानाही सामान्य शेतकऱ्यांच्या बळावर शेट्टी यांनी सुरवातीला जिल्हा परिषद, त्यानंतर विधानसभा आणि आता लोकसभेतही पहिल्याच प्रयत्नात निवडून येण्याची हॅटट्रिक साधताना श्रीमती माने यांची खासदारकीची हॅटट्रिक हुकविली. निवडणूक प्रचारातील “वहिनींना सुट्टी, राजू शेट्टी’ ही घोषणाच त्यांनी प्रत्यक्षात उतरविली.
श्री. शेट्टी यांना ४ लाख ८१ हजार २५ मते, श्रीमती माने यांना ३ लाख ८५ हजार ९६५, तर शिवसेनेच्या पाठबळावर रिंगणात उतरलेले शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांना अवघी ५५ हजार ५५ मते मिळाली. बसपचे उमेदवार अनिलकुमार कानडे यांना २७ हजार ४६५ मते मिळाली. हातकणंगले मतदारसंघ हा राष्ट्रवादीसाठी सुरवातीपासून सुरक्षित वाटत होता. कारण त्या मतदारसंघातून श्रीमती माने यांच्याशिवाय पक्षाकडे कुणी उमेदवारीच मागितली नव्हती. प्रकाश आवाडे व त्यांचा मुलगा राहुल आवाडे यांनी बंड करण्याचा इशारा दिला होता; मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेतल्यामुळे माने यांचा मार्ग मोकळाच झाला; परंतु राजू शेट्टी यांनी अर्ज दाखल केला आणि पहिल्या दिवसापासूनच मतदारांकडून त्यांना प्रतिसाद मिळत गेला. गृहमंत्री जयंत पाटील यांनी स्वतःच्या मतदारसंघात जेवढी ताकद पणाला लावली नव्हती, तेवढी ताकद लावूनही त्यांच्या प्रभावक्षेत्रातील इस्लामपूर व शिराळा विधानसभा मतदारसंघात श्रीमती माने यांना जुजबी मताधिक्य मिळाले. उर्वरित चारही विधानसभा मतदारसंघांत शेट्टी यांनी एकतर्फी वर्चस्व राखले. निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात जातीच्या राजकारणाचा डाव खेळला गेला; मात्र त्याला मतदारांनी फारसा प्रतिसाद दिला नाही.
पहिल्याच फेरीत श्री. शेट्टी यांनी १० हजार ३३३ मतांची आघाडी घेतली आणि तेथेच निकाल स्पष्ट झाला. धैर्यशील माने यांच्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर निराशा पसरली. ही आघाडी फेरीनिहाय वाढत गेल्यामुळे माने गटाच्या कार्यकर्त्यांना पुढच्या मतमोजणीत फारसे स्वारस्य राहिले नाही. त्यांनी तेथून बाहेर पडणेच पसंत केले. एकूण २७ फेऱ्यांत त्यांची आघाडी टप्प्याटप्प्याने वाढतच राहिली. पाचव्या फेरीत त्यांच्या मतांत थोडीशी घट झाली. त्यावेळी जेमतेम दोन लाख मतांची मोजणी झाली होती. अद्याप तब्बल पंधराहून अधिक फेऱ्या जाहीर होणार होत्या आणि श्री. शेट्टी यांचे मताधिक्य वीस हजार होते. त्यामुळे यापुढील फेरीत काहीही चमत्कार होऊ शकेल, अशी कार्यकर्त्यांना आशा होती; पण त्यापुढील फेऱ्यांत श्री. शेट्टींच्या मताधिक्यात ठराविक अंतराने वाढच होत गेली. ही वाढ अखेरपर्यंत कायम राहिली. दहा फेऱ्यांची अधिकृत घोषणा बाकी होती; मात्र कार्यकर्त्यांचा उत्साह वाढल्याने त्यांनी श्री. शेट्टी यांना मतमोजणीच्या ठिकाणी येण्याचा आग्रह धरला. त्यानंतर प्रत्येक फेरीत श्री. शेट्टींचे मताधिक्य वाढतच गेले. श्री. शेट्टी यांना पहिल्या दहा फेऱ्यांत वीस हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यावेळी जेमतेम चाळीस ते पंचेचाळीस हजारांचे मताधिक्य मिळेल, असा कार्यकर्त्यांचा अंदाज होता; मात्र अंदाजापेक्षा जवळजवळ दुपटीने मताधिक्य वाढले.
श्री. शेट्टी यांना मिळालेले मताधिक्य आणि विजयाची निश्चिती झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गावागावांत निरोप दिला. त्यामुळे अधिकृत घोषणेपूर्वीच गावागावांत जल्लोष सुरू झाला. फटाक्यांची प्रचंड आतषबाजी आणि गुलालाची उधळण करीत गावागावांत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा गट फिरू लागला. दुपारी साडेचारच्या सुमारास श्री. शेट्टी मतमोजणीच्या ठिकाणी आले. कार्यकर्त्यांनी त्यांना उचलूनच मतमोजणीच्या ठिकाणापर्यंत आणले.
दोन नेते
हातकणंगले मतदारसंघातून शेतकरी संघटनेच्या माध्यमातून कार्यरत असलेले दोन नेते निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यातील शेट्टी विजयी झाले; तर रघुनाथदादा पाटील यांचा मात्र पराभव झाला. बाविसाव्या फेरीत रघुनाथदादा यांना अवघी ४५ मते मिळाली आणि त्याच फेरीत बसपच्या कानडे यांना ५२ मते मिळाली. कित्येक फेरीत श्री. शेट्टी यांची मते श्री. पाटील यांच्यापेक्षा दहा ते वीसहून अधिक पट जास्त आहेत. हा दोन नेत्यांवरील सामान्य जनतेच्या विश्वासार्हतेचा फरक आहे.
असाही योगायोग…
आमदार राजू शेट्टी यांनी २००२ मध्ये सर्वप्रथम जिल्हा परिषदेची निवडणूक उदगाव (ता. शिरोळ) मतदारसंघातून लढविली. या निवडणुकीत त्यांनी शोभा कोळी यांचा पराभव केला. गेल्या विधानसभा निवडणुकीत सौ. रजनी मगदूम यांचा पराभव करून ते आमदार झाले. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या खासदार श्रीमती निवेदिता माने यांचा पराभव करून ते खासदार झाले. तिन्हीही वेळी त्यांनी महिला उमेदवारांचा पराभव केला. हाही एक योगायोगच.
कार्यकाल पूर्ण होण्याआधीच
राजू शेट्टी २००२ मध्ये जिल्हा परिषद सदस्य झाले. जिल्हा परिषदेचा त्यांचा कार्यकाल पूर्ण होण्याआधीच त्यांनी २००४ ची विधानसभेची निवडणूक लढविली व ते १८ हजार ५०० मतांनी विजयी झाले. आमदारकीचा त्यांचा कार्यकाल अजून तीन महिने शिल्लक असतानाच त्यांनी लोकसभेची निवडणूक लढविली व ते मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले.
कार्यकर्त्यांत उत्साह
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांत निकालाच्या पूर्वसंध्येपासूनच उत्साह होता. उत्साही कार्यकर्ते काल सायंकाळीच येथे मुक्कामास दाखल झाले होते. मतमोजणीसाठी जाणाऱ्या प्रतिनिधींची संख्या त्यामध्ये मोठी होती. काल या सर्वांना एकत्रित ठेवून मतमोजणीबाबत सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. श्री. शेट्टी काल स्वत: या कार्यकर्त्यांच्या समवेत रात्री उशिरापर्यंत कोल्हापुरात होते. आज सकाळपासूनच विविध भागांतून येणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचाच अधिक समावेश होता. त्यामुळे विजयाचा आत्माविश्वास निकालापूर्वीच होता.
महामार्गावर वाहतूक विस्कळित
विजयानंतर हातकणंगले, शिरोळ तालुक्यातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने श्री. शेट्टी यांच्यासमवेत दुचाकी वाहनावरून निघाले. सुमारे पाचशे ते सहाशे दुचाकी वाहनांमुळे महामार्गावरील वाहतूकच विस्कळित झाली होती. परिणामी कोल्हापूरकडे येण्यास निघालेल्या श्री. शेट्टी यांना पोहोचण्यास विलंब झाला.
——————————————–
मतमोजणीच्या ठिकाणी आज प्रशासनाने तसेच बचत गटाने चांगली सोय केली होती. फेरीनिहाय आकडेवारी देण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकरिता स्वतंत्र व्यवस्था केली होती. दरवेळी चहा व जेवणाची व्यवस्था ठेकेदारांना दिली जात होती. यावेळी ही व्यवस्था बचत गटांमार्फत करण्यात आली. या बचत गटांमार्फत सकाळी वेळेवर नाष्टा, चहाबरोबरच दुपारी जेवणाची व्यवस्था चांगल्या पद्धतीने केली होती. त्यामुळे पोलिस, मतमोजणी अधिकारी व कर्मचारी यांना वेळेवर व शिस्तबद्ध रीतीने जेवण मिळाले. एकाच ठिकाणी जेवणासाठी गर्दी होऊ नये यासाठी स्वतंत्रपणे चार ठिकाणी चहा, नाष्टा व जेवणाची सोय केल्यामुळे यावेळची शिस्त चर्चेची ठरली.