शेट्टी-मंडलिक यांचा अखेर घटस्फोट
शेट्टी-मंडलिक यांचा अखेर घटस्फोट
विश्वास पाटील
Friday, September 25th, 2009 AT 6:09 PM
हवा बदलली – कोल्हापुरात आठ मतदारसंघांत बंडखोरांचे आव्हान
कोल्हापूर – लोकसभा निवडणुकीत राज्यात हवा निर्माण करणारे खासदार सदाशिवराव मंडलिक व खासदार राजू शेट्टी यांनी विधानसभा निवडणुकीत मात्र एकमेकांविरोधात शड्डू ठोकला आहे. मंडलिक यांचा मुलगा प्रा. संजय निवडणूक लढवित असलेल्या कागल विधानसभा मतदारसंघातून श्री. शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उमेदवारी मंडलिक यांचे विरोधक असलेल्या संजय घाटगे यांना दिली आहे. त्यामुळे हा वाद अधिकच विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात या निवडणुकीत दहापैकी तब्बल आठ निवडणुकीत बंडाळी माजली आहे. त्यातून कोणताच पक्ष सुटलेला नाही.
अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मतदारसंघनिहाय बंडखोरीचे चित्र स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीत सहानुभूतीची लाट निर्माण करणाऱ्या मंडलिक-शेट्टी यांची विधानसभा निवडणुकीतील व्यूहरचना काय असेल, याबद्दल राज्यभर औत्सुक्य होते. हे दोघे नेते डाव्या आघाडींसह एकत्र येऊन जिल्ह्यातील प्रस्थापित नेतृत्वांना घरी बसवणार काय अशी उत्सुकता लागून राहिली होती. परंतू घडले उलटेच. या दोघांची तोंडे दोन दिशेला गेली आहेत. श्री.शेट्टी हे रिपब्लिकन डाव्या आघाडीचे घटक आहेत. श्री.मंडलिक हे देखील त्या आघाडीचे घटक असले तरी त्यांची आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी जास्त सलगी आहे. मंडलिक यांना कागल,राधानगरी आणि चंदगड हे तीन मतदारसंघ हवे होते. परंतू आघाडीच्या राजकारणात फक्त कागलच त्यांच्या वाट्याला आला. चंदगड जनता दलास गेला. व राधानगरी मधून श्री.शेट्टी यांनी आपला उमेदवार परस्पर जाहीर करून टाकला. त्यातून या दोन नेत्यांत वितुष्ट निर्माण झाले. कागलमध्ये संघटनेचा उमेदवार असणार नाही असे शेट्टी यांनी प्रारंभी जाहीर केले होते. परंतू मंडलिक यांनी “मी कुणाच्या मेहरबानीवर निवडून आलेलो नाही. मी माझ्या ताकदीवर निवडून आलो असल्याचे सांगून मध्यंतरी शेट्टी यांच्यावर बोचरी टीका केली. त्यामुळे संघटनेची ताकद दाखविण्यासाठी कागलमध्ये शेट्टी यांनी उमेदवार दिला आहे.
राज्यात पन्नास जागा लढविणाऱ्या विनय कोरे यांचा जनसुराज्य शक्ती पक्ष जिल्ह्यांत पाच ठिकाणी लढत असून तेवढ्याच जागांवर तडजोड म्हणून त्यांनी उमेदवारच उभे केलेले नाहीत. शिवसेनेत कोल्हापूर उत्तरमध्ये बंडखोरी झाली आहे. कोल्हापूर दक्षिणमध्ये माजी आरोग्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते दिग्विजय खानविलकर यांनी बंड केले आहे. करवीरमध्ये चंद्रदिप नरके यांनी कॉंग्रेसला रामराम करून शिवसेनेतून निवडणूक लढवली आहे. राधानगरीत कॉंग्रेसमध्ये बंडखोरीचे पेव उठले आहे. चंदगडमध्ये एकाचवेळा राष्ट्रवादी, जनसुराज्य आणि डाव्या आघाडीतही बंड माजले आहे. त्यामुळे या मतदारसंघाचे नाव चंदगड ऐवजी “बंडगड’ असे करा असे लोक चेष्टेने म्हणू लागले आहेत. कॉंग्रेसमध्ये हातकणंगले आणि शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघातही पक्षाच्या विरोधात उमेदवार रिंगणात उतरले